मृत व्यक्तींच्या नावावर खोटी कागदपत्रे बनवून जमीन हडपण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : दोन मृत व्यक्तींच्या मृत्यूचे खोटे आणि बोगस प्रमाणपत्रे तयार करून ती खरी भासवून, खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांच्या मालकीची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ जुलै २०१८ ते २२ जून २०२४ या कालावधीत आळंदी देवाची आणि तालुका कार्यकारी दंडाधिकारी, राजगुरूनगर, ता. खेड येथे घडली.
( Attempt to grab land by making false documents in the names of deceased persons)

या प्रकरणी सुनिल किसन कड (३६, वाकी बु, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश विठ्ठल भोसले (४०, आळंदी देवाची, खेड) आणि त्याचे इतर अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या वडिलांची मृत मावस मावशी कै. पारुबाई कृष्णा शेवाळे आणि मृत रेऊबाई मास्तराव भोसले यांच्या मृत्यूचे खोटे व बोगस प्रमाणपत्रे मुख्याधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू आळंदी नगरपरिषद यांच्या सही-शिक्क्यानिशी तयार केले. ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून, राजगुरुनगर येथील तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर खोटे प्रतिज्ञापत्र लिहून दिले. या खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आणि मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे, मृत पारुबाई कोम कृष्णा शेवाळे यांच्या मालकीची आळंदी येथील ५३ गुंठे जमीन स्वतःला आणि प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या इतरांना वारस असल्याचे नमूद केले. बेकायदेशीर मालकी हक्क मिळवून मिळकत हडपण्याच्या उद्देशाने त्यांनी गाव कामगार तलाठी, आळंदी यांचेकडे प्रकरण सादर केले आणि फेरफार क्रमांक १२६८५ अन्वये नोंद मंजूर करून घेतली. आळंदी पोलीस या फसवणुकीचा तपास करत आहेत.