
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी कांग्रेस प्रमुख शरद पवार यांच्याकृपेमुळे मुख्यमंत्री बनले आहेत. हे संपूर्ण सरकारच पवार यांच्या कृपेमुळे झाले आहे, नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता ? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सिंधुदुर्ग येथे पूजा चव्हाण यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाबद्दल माध्यमांशी बोलत असताना राणे यांनी हे विधान केले.
नारायण राणे हे सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यापेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे कानून माहीत असलेला आहे, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावर बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र या आरोपांना सामोरे जायचे सोडून संजय राठोड पळत आहेत. समोर या आणि आरोपांना उत्तरे द्या, चोरी असल्याशिवाय व्यक्ती पळतो का?, असा सवालही राणे यांनी केला.
राज्यात सध्या कोरोना पुन्हा वाढतोय, लेकीबाळी मारल्या जात आहेत, पूजा चव्हाण सारख्या तरुणीला एका नेत्यामुळे मृत्युमुखी पडावे लागले, असे सगळे असताना महाराष्ट्राचे सरकार काय करतंय? असा प्रश्न राणे यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित होतो. आता या बाबतीत पुढे काय होतं हे बघणं महत्वाचें ठरणार आहे.
