देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा वाद तीन वर्षानंतरही कायम आहे. हा शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी आपण यावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता शरद पवारांनीही पुढचं विधान केलं आहे.’आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काफी है,’ असं सूचक विधान शरद पवारांनी केलं.
या सगळ्या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाबरोबर युती हवी होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नको होते. भाजपाच्या कसब्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, हाच शरद पवार यांचा एकमेव अजेंडा होता, हे मी यापूर्वीच सांगितले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपुढील अडचणी वाढतील. पक्ष विस्ताराला मर्यादा येतील, याची जाणीव शरद पवार यांना होती.
दरम्यान शरद पवारांच्या विधानानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवा गुगली टाकली आहे. ‘शरद पवारांनी खुलासा केलेला आहे, चांगलं आहे. राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरून लागली, त्याच्यामागे कोण होतं? याचे उत्तर दिले तर सर्व कड्या जुळतील आणि सगळ्यांच्या समोर सगळं येईल,’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
