शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आता ठाण्यात; शिवसेनेच्या पत्रकात आनंद आश्रमचा पत्ता

शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात असणार आहे. सचिव संजय मोरे यांनी काढलेल्या पत्रकावर आनंद आश्रम असा पत्ता आहे. त्यामुळे यापुढे आनंद आश्रम हे शिंदेंच्या शिवसेनेचं ठाण्यातील मध्यवर्ती कार्यलय असणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.मंगळवारी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढले ज्यात बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करावा, असे म्हटले होते. हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आले होते. मात्र त्यात अधिकृत पत्ता ठाण्याच्या आनंद आश्रमाचा देण्यात आला आहे. आतापर्यंत दादरमधील शिवसेना भवन हेच शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय होते. मात्र आता शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर सध्यातरी ठाण्यातील आनंद आश्रम हेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून कारभार बघणार असे दिसत आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आलाय. अशाच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के मिळण्याचं सत्र काही थांबेना. शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालयच बदलून शिंदे गटानं आणखी एक धक्का दिलाय.

शिवसेना स्थापनेनंतर दहा वर्षानंतर सेनेला हक्काचं ठिकाण मिळालं. देशातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इथं यायचा आपली भावना मांडायचा आणि त्याला जितका विश्वास बाळासाहेबांवर होता. तितकाच विश्वास शिवसेना भवनाविषयी होता. मुंबईतील दादर येथे असणारं शिवसेना भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना, मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचं असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच असणार आहे.