धीरेंद्र महाराजांचा मुंबईमध्ये कार्यक्रम; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध

‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पाडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.

बागेश्वर बाबा ही देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेली व्यक्ती आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळखी माणसाची माहिती क्षणात सांगणे, अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या दरबारात करत असतात. देशभरातील त्यांच्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे.

नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. दुसरीकडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं. या कार्यक्रमात जवळपास 50 हजार ते एक लाखापर्यंत भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मिरा रोडच्या एस. के. स्टोन ग्राउंड येथे बागेश्र्वर धीरेंद्र शास्त्री यांचे दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे.