भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत जागा वाटपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं होतं. पण अशी चर्चा आत्ताच करणं, गरजेचे नाही, असं म्हणत पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटलांनी रंगलेल्या विविध चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी भाजप विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांची नेहमीच तयारी करत असतं, आमची हीच तयारी शिवसेनेला उपयोगी ठरेल, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये ते बोलत होते.
त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी तीन उच्च अशा आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. तरी देखील अत्यावश्यक सेवेतील संपकरी हे देखील संपात सहभागी झाले आहेत. मात्र हा काळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा असल्याने तसेच रुग्णांचे मोठया प्रमाणात हाल होत असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं, अस आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर हेल्थकेअर सेंटर आणि आय हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
