छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने नामांतराच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील क्रांती चौक ते औरंगपुरा या मार्गादरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ अनेक पक्षाच्या आणि संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे.हिंदू जनगर्जना मोर्चाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. क्रांती चौकात हिंदू जनगर्जना मोर्चातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज निघणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. या मोर्च्यामुळे शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तसेच बाहेरच्या काही लोकांना या मोर्च्यासाठी बोलवण्यात आले आहे. तर बाहेरून येणारे लोकांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची पार्श्वभूमी असून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं, जलील म्हणाले आहे. तर याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेत माहिती दिली असल्याचं देखील जलील म्हणाले आहेत.
