अनिल जयसिंघानीचे राकेश मारिया कनेक्शन? फडणवीस यांच्या विरोधानंतरही दिले होते पोलीस संरक्षण

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या कथित लाच प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील सहआरोपी अनिल जयसिंघानी याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासोबतच्या मधुर संबंधांची चर्चा सुरू झाली आहे. मारिया यांनी जयसिंघानी याला पोलीस संरक्षण दिले होते. विशेष म्हणजे दोन्ही वेळी देवेंद्र फडणवीस यांनी ते काढून घेतले होते. अनिल जयसिंघानी यांचे पोलिस संरक्षण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी दोनदा काढून टाकले होते.

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 2010 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट बुकी असलेल्या जयसिंघानी याला पोलीस संरक्षण असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.जयसिंघानी याला विशेषाधिकार का दिला जात आहे, असा जाब त्यांनी विचारला. या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाल्याचे पाहून तत्कालीन गृहमंत्री आरआर पाटील यांनी जयसिंघानी याचे पोलीस संरक्षण काढून घेतले.त्यानंतर राकेश मारिया 2014 मध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. त्यांनी जयसिंघानी याला पुन्हा पोलीस संरक्षण दिले. 2014 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री झाले. मारिया यांनी त्यांना पूर्ण अंधारात ठेवले. भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 1200 कोटी रुपयांच्या वर्ल्डकप बेटिंग प्रकरणातील सूत्रधाराला संरक्षण का बहाल करण्यात आले यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात एक वर्षापूर्वी पोलीस संरक्षण दिले होते आणि ते मागे घेतले जाईल. त्याप्रमाणे जयसिंघानी याचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले.

त्यानंतर जयसिंघानी फरार झाला. मात्र त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मारिया यांनी केला नाही, अशी पोलिस दलातच चर्चा होती. 2015 मध्ये डीएनए या वृत्तपत्राने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये एका हेअर सलून मालकाने जयसिंघानी आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जयसिंघानीच्या मुलाची या सलूनवाल्याशी भांडणे झाली. मुलाने फोन केल्यावर जयसिंघानी याने सलूनवाल्याला फोनवरून धमकी दिली. फरार जयसिंघानी याला शोधण्यासाठी मोबाईल लोकेशन का घेतले नाही, मुलासोबत संपर्कात असूनही पोलीसांनी चौकशी का केली नाही असे अनेक प्रश्न मारिया यांच्याबाबत उपस्थित केले गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मारिया यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविले. त्यांची होमगार्ड महासंचालकपदी बदली करण्यात आली. यामुळे मारिया फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा त्यावेळी होती.