माझं काम पटलं तर मत द्या; नाहीतर देऊ नका – नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अलीकडच्या काही वर्षांत वारंवार राजकारणातून निवृत्तीची भाषा करत समाजकारण करायचे असल्याचे सांगतात. रविवारी गडकरींना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले की, मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले.

जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर अशा क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे, असे गडकरी म्हणाले. “मी प्रेमाने नाहीतर ठोकून करतो,” असं त्यांनी म्हटलं. “भविष्यात याच क्षेत्रात जोमाने काम करायचे आहे, कारण यामुळे भारताची अर्थव्यवस्था नाही तर ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकतो,” असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. “आजवर भरपूर कामे केली आहेत. ती लोकांना पटली असेल तर लोक मतं देतील, नाहीतर देणार नाहीत. मी काही लोणी लावायला तयार नाही. मी नाही तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे आणि या कामातून भविष्य बदलू शकतं हे मला दिसतं,” असं गडकरी म्हणाले.नागपूरमध्ये ते वनराई फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना रविवारी (26 मार्च) मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला.