
पश्चिम बंगाल येथे वाढता हिंसाचार हा तेथील परिस्थिती, आणि तेथील राजकारणाबद्दल वाचा फोडणारा आहे. मात्र तसेच काही महराष्ट्रात होऊ लागले तर? बुधवारी संध्याकाळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक करण्यात आली. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. यावरून आता भाजप नेते आक्रमक झाले असून, ‘आपण महाराष्ट्रात राहतो, पश्चिम बंगालमध्ये नाही,’ असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
गोपीचंद यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे कि पुरोगामी महाराष्ट्रात अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे, एकाधिकारशाही नाही. तसेच, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, “भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. हा तर बहुजनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही विचारांची लढाई विचाराने लढू, दगडाने नाही.”
बुधवारी दुपारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या वाहनातून घोंगडी बैठकीला आले होते. एका अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सरकारमध्ये आल्यावर ४ महीन्यात ओबीसी आरक्षण देऊ नाहीतर राजकीय सन्यास घेईन असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने आता ओबीसी आरक्षणावरून गंभीर होऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ओबीसी आरक्षणावरून आता पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
