दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याची मागणी; उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शहांची भेट

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक” उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली.

छ. शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित केले जावे, असेही उदयनराजेंनी अमित शहा यांना सांगितले. छ. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करणे गरजेचे आहे, असा मुद्दा खा. उदयनराजे भोसले यांनी मांडला. यावर कायदेतज्ज्ञ तसेच अभ्यासकांशी चर्चा करु, असे आश्वासन शहा यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असे खा. भोसले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.