राहुल गांधी आज सुरत न्यायालयात 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात अपिल करणार

मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवार, 3 एप्रिल रोजी सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या प्रकरणी झालेल्या शिक्षेविरोधात राहुल 11 दिवसांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तसेच, ते नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहे. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही सुरतमध्ये येऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. तसेच, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंह सुखू (हिमाचल प्रदेश) हे तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही सुरत न्यायालयात उपस्थित असणार आहेत.

राहुल गांधी यांनी २०१९ ला मोदी आडनावावरून टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर २३ मार्चला राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. राहुल यांना 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर २४ मार्चला लोकसभा सचिवालयाने तात्काळ राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या शिक्षेला 22 एप्रिलपर्यंत जर स्थगिती किंवा ही शिक्षा रद्द झाली नाही तर त्यांना कारागृहात जावं लागणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय होतंय यावर राहुल गांधी यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी मोदी आडनावाच्या मुद्द्यावर पाटणाच्या दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयानं राहुल गांधींना समन्स बजावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.