मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील, असा मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं दिसून येत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे राजकीय वर्तुळातून नेते गांभीर्याने पाहत आहेत.
“काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
