मोदींनी नेत्यांना शिकवले नाक मुठीत घेऊन शब्द गिळायला!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करीष्मा असा आहे की रामायणाला काल्पनिक ठरवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाला रामायणाचा अर्थ सांगत फिरतायत. कधी काळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभेला आलेल्या मुस्लिमांची संख्या मोजतायत. मोदींनी या दोन्ही नेत्यांना नाक मुठीत घेऊन शब्द गिळायलाही शिकवले आहे.

अमित शहांना राहुल गांधींच्या बाबतीत पत्रकार परिषेदेत एक प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शहांनी दोन किस्से सांगितले. गुजरात मध्ये अमित शहा गृहमंत्री असताना त्यांना एका बनावट एन्काऊंटर प्रकरणात गुंतवण्यात आले. त्या प्रकरणात अमित शहा यांनी न्यायालयीन लढा लढला आणि स्वतःची निर्दोष सुटका करून घेतली. अमित शहा म्हणाले होते हा मार्ग राहुल गांधींना देखील मोकळा होता.

राहुल गांधी यांना बदनामीच्या प्रकरणात जेव्हा दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी संतप्ततेचा आव आणला होता. मी गांधी आहे सावरकर नाही. मी कोणत्याही परिस्थितीत माफी मांगणार नाही. अशी गर्जना राहुल गांधींनी केली होती. प्रत्यक्षात राहुल गांधी या आधी अनेक प्रकरणात माफी मागवून मोकळे झाले आहे. राफेलच्या प्रकरणात, भिवंडीत सावरकरांच्या प्रकरणात माफी मागितली आहे. अशा अनेक प्रकरणात राहुल गांधींनी माफी मागवून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. माफी मागणार नाही म्हणणाऱ्या राहुल गांधींना दहा दिवसात वस्तूस्थितीचे भान आले, बहुधा जाग आली आणि त्यांनी न्यायालयात अपील करण्याचा मार्ग स्वीकारला.

काँग्रेस नेते राहुल गांधी वाटेल तशी विधाने करत असतात. तसाच प्रकार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे करत असतात. संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंना मविआची वज्रमूठ कशा पद्धतीची आहे हे सांगावे लागले. भाजप सोबत असताना उद्धव ठाकरेंची सोय होती. भाजपवरती वाटेल तशी आगपाखड करता येत होती. त्यांच्या विरोधात अग्रलेख लिहता येत होते. महाविकास आघाडी मध्ये गेल्यावर मात्र उद्धव ठाकरेंचा बाणा बदललेला आहे. आता सामनामधून मविआच्या आरत्या ओवाळताना उद्धव ठाकरे दिसत आहेत. एवढ करून सुद्धा मित्र पक्ष काय करतात हे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर उद्धव ठाकरे बोलायला जात असताना अजित पवार यांनी डोळा मारला होता.

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंना मोठी आणि उंच खुर्ची देण्यात आली होती. यावर ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते हुरळून गेले होते. यावर अजित पवारांचे उत्तर अत्यंत वेगळेच होते. इथं डोळा न मारता त्यांनी उद्धव ठाकरेंची हवा काढून टाकली. याच स्पष्टीकरण देताना जेव्हा ते पत्रकारांशी बोलले तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मानेवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती.

संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेचे ठाकरे गटाकडे नेतृत्व होते तर या सभेला नाना पटोले यांनी वज्रदांडी मारली होती. त्यांची तब्येत बरी नाही असे सांगितले जात असले तरी महाविकास आघाडीची सभा झाल्याच्या अवघ्या बारा तासानंतर नाना पटोले पूर्णपणे बरे झालेले आपण बघितले. राहुल गांधी यांच्या सोबत सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी ते सुरतला देखील गेले. जेव्हा मीडियाने नाना पटोले यांना तब्येतीबद्दल विचारले तेव्हा नाना म्हणाले, “माझ्या तब्येतीला काहीही झालेले नाही. उलट माझ्यामुळे इतरांच्या तब्येती खराब होतात.” या प्रकरणात नाना पटोले यांनी संजय राऊत यांना अक्षरशः तोंडघशी पाडले. संजय राऊत किती धडधडीत खोटे बोलतात ते या निम्मिताने स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस मधील अंतर्गत भांडणामुळे नाना पटोले महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित नव्हते. वज्रमूठ सभा ही तिन्ही पक्षांची ताकद दाखवण्यासाठी होती. मात्र, येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरेंना मोठी खुर्जी ‘मानामुळे’ नाही तर त्यांच्या ‘मानेमुळे’ देण्यात आली होती. असे अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले तर नाना पटोलेंनी या सभेला दांडीमारून आपण वज्रमूठे बाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहे. या सभेला नाना पटोलेंची अनुउपस्थिती अनेक किंतु-परंतु उपस्थित करून गेली. पुढे या वज्रमूठीत काँग्रेसचा पंजा असेल की नसेल याची शंका निर्माण करून गेली.