घरातल्या गोष्टी काढल्या तर महाराष्ट्रात फिरु शकणार नाही, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

मुंबई : आम्ही तुमच्या घरातल्या सर्व गोष्टी काढू का? आम्ही गोष्टी काढल्या तर महाराष्ट्रात फिरु शकणार नाही. मोदी, शाहांनी पाठ फिरवली आणि बोट दाखवलं तर योग्य जागी तुझं जाणं होईल. सगळं करुनही बाहेर आहेस ते केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत दिला.


आम्ही शिवसेना राज्यभर वाढवली पण ठाकरे आमच्याच जीवावर उठले. आमचं लक्ष अजून गेलं नाहीये उद्धव तुझ्याकडे. कारण
बाळासाहेब जाताना तुला सुरक्षित करुन गेले. बाळासाहेबांना आम्ही दैवत मानायचो. पण तू तुझ्या आदित्यसाठी काही करुन ठेवलं नाहीस, असाही इशारा राणे यांनी दिला. राणे म्हणाले, फार भयानक काहीतरी घडलंय असं वातावरण करण्यात आलं. विषय एवढा गंभीर खरंच होता का? खरं त्या महिलेला मार लागला होता का?, त्या गरोदर होत्या का?-
उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ते महाभयानक केलं असा आरोप करून राणे म्हणाले, या माणसाला चांगलं बोलता येत कि नाही हा प्रश्न आहे. शिवराळ भाषा वापरली गेली. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशोभनीय भाषा वापरली. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेलं बरं.


उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले होते, याचा त्यांना विसर पडला. अडीच वर्षातील अडीच तासही ते मंत्रालयात गेले नाहीत. सुशांत सिंह ही आत्महत्या नव्हती, त्यांना का मारलं? असा सवाल करून राणे म्हणाले, दिशा सालियन हिच्यावर अत्याचार करुन का मारलं? ही केस ओपन का झाली नाही? गुन्हेगारांना मदत करणारा व्यक्ती मुख्यमंत्री होती. यांची लायकी आहे का पंतप्रधानांबद्दल बोलायची?


मी बोललेलं आता देवेंद्रजींना पटतंय. एक नंबरचा खोटारडा, विक्षिप्त, खोटं बोलणारा माणूस आहे, असा हल्लाबोल ठाकरेंवर करताना राणे म्हणाले, देवेंद्रकडून गोडगोड बोलून किती कामं करुन घेतली.आता कोणत्या घाणेरड्या भाषेत टीका करतो. फडतूस शब्दाचा अर्थ कळतो का त्याला?


देवेंद्रजी ५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते, भाजप पक्षाचे अध्यक्ष होते. हा आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलतोय, हा महाफडतुस आहे. देवेंद्रने केलेलं काम, देवेंद्रची वैचारिकता, बौद्धिकता, पक्षनिष्ठा, कार्यतत्परता यापैकी कोणते गुण उद्धव ठाकरेमध्ये आहेत? ठाकरेने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेलं, असा मुख्यमंत्री म्हणजे राज्याला कलंक आहे. शिव्या द्यायचं काम उद्धव ठाकरे करु शकतो, बाकी काही करु शकत नाही