मच्छिमार दिवस दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. या वर्षापासून हा दिवस साजरा केला जाईल. या माध्यमातून मत्स्य व्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सह्याद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री ॲड. आशिष शेलार, महेश बालदी, क्षितिज ठाकूर, योगेश कदम, राजेश पाटील, वैभव नाईक, राजन साळवी, सुनील राणे, श्रीनिवास वणगा, रमेश पाटील, डॉ.भारती लव्हेकर, मनीषा चौधरी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार आदी उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आगामी काळात पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या समन्वयाने मच्छिमार बांधव आणि सागरी पर्यटनासाठी येणाऱ्यांसाठी कोळी महोत्सव आयेाजित करण्यात येईल. मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक जागा, रचना करुन देईल. मच्छिमारांच्या सोयीसाठी मिरकरवाडा, भाऊचा धक्का आणि ससून डॉक हे तीन बंदरे अधिक विकसित करण्यात येत आहेत. मत्स्य उत्पादन, विक्रीसाठी मच्छीमार बांधवांना हक्काच्या बाजारपेठेसाठी पालघर जिल्ह्यातील साटपाटी येथे सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार आहे. मत्स्य व्यवसाय हा रोजगारभिमुख व्यवसाय आहे. मच्छिमारांना आरोग्य सुविधेसह नुकसान झाल्यानंतर सानुग्रह अनुदान देणे, डिझेल परतावा देणे यासारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल.
राज्याची सागरी किनारपट्टी 720 किलोमीटर असून 7 सागरी जिल्हे आहेत. सध्या 3 प्रमुख मासेमारी बंदरे असून 3 निर्माणाधीन, तर 4 प्रस्तावित बंदरे आहेत. सध्या 173 मासळी उतरविणारी केंद्रे असून 456 मच्छिमार गावे आहेत. सध्या 3 लाख 65 हजार मच्छिमार लोकसंख्या आहे. रापण जाळे, बॅग/डोल जाळे, गील जाळे, ट्रॉल जाळे, पर्सनीन जाळे या मासेमारीच्या पद्धत आहेत. सध्या एकूण 21,558 नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत, तर 17,355 परवानाधारक मासेमारी नौका आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम,2021 मध्ये सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवा यांनी दिली.
