भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्यही नक्कीच मोलाचे ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हाॅटेल ताज महल पॅलेस येथे इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने (IFCCI) ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘आयएफसीसीआय’चे अध्यक्ष सुमित आनंद, महासंचालक पायल कंवर, वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली, फ्रान्सचे व्यापारविषयक आयुक्त एरिक फॅजोल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा, पश्चिम विभागीय संचालक श्वेता पहुजा, यांच्यासह फ्रान्स आणि भारतातील प्रमुख उद्योजक, बँकर्स, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
एकूण १४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात ₹ ५,७०० कोटी गुंतवणूक करणार असून यामुळे ५,३०० थेट रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात नवे उद्योग उभारणी, उद्योग विस्तारासाठी भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांदरम्यान सामंजस्य करार होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रही अग्रेसर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यात युवा शक्ती मोठी आहे. हे राज्याचे बलस्थान आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचा विकास करणे, एक्सप्रेस वे, मेट्रो, सागरी सेतू यांसारख्या विकासकामांत वेगाने काम करत असल्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
