पार्थची चर्चा सुरू झाल्याने अमोल कोल्हे समजून घेतायेत नवीन भाजप!

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. आज जागतिक पुस्तक दिन आहे. यानिमित्त सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये वाचाल तर वाचाल, असे लिहीले आहे. या फोटोच्या एका बाजूला शरद पवार यांचे नेमकचि बोलणें या नावाचे पुस्तक वाचताना अमोल कोल्हे दिसत आहे.

यासोबतच दुसऱ्या बाजूला ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक वाचतानाचे फोटो अमोल कोल्हेंनी पोस्ट केले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घेतली होती. त्यानंतर पुढील निवडणूक भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी सूचक असं वक्तव्य केलं आहे. ‘आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं?’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पार्थ यांचा गेल्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा तेथून लढण्याचे धाडस पार्थ करणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी तुलनेने सोपा असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते लढण्याची चर्चा आहे. त्यामुळेच द न्यू बीजेपी हे पुस्तक वाचत असल्याची पोस्ट करून कोल्हे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.