रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हंटल की, कोणताही प्रकल्प करताना स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. त्यांचा विरोध असेल तर ते समजून घेत त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कोकणात काही नवीन होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे’. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भू्मिका आहे असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, मी उदय सामंतांकडून बारसू रिफायनरीचा आढाला घेतला आहे. चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला त्यांना दिला आहे. सध्या सुरु असलेलं मातीचे परिक्षणाचे काम थांबवा व विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घ्या अशी विनंती आपण उदय सामंत यांना केली असल्याचे शरद पवारांनी सांगितलं. त्यानुसार उद्याच यासंदर्भात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली. उद्याच्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. या बैठकीनंतर अजूनही काही प्रश्न असतील आणि काही पर्याय असेल तर त्यावर चर्चा करू असेही पवारांनी सांगितलं.
दरम्यान, बारसू येथील प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी वेगवेगळी भूमिका बघायला मिळाली. याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं. “आमची ठाकरे गटाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. उद्या यासंदर्भात बारसू येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर आनंदच आहे. मात्र, यावर तोडगा नाही निघाला, तर यावर चर्चा करता येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
