तीन दिवस रजेवर असल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लेक्ष करत मुख्यमंत्री रजेवर गेले असं ते म्हणाले होते. दरम्यान, विरोधाकांच्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी कामाद्वारे उत्तर देण्यात प्रयत्न केला आहे. सातारा दौऱ्यावर असतानाही त्यांनी तब्बल ६५ पेडिंग फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्यांचा विनाविलंब नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ नस्तींचा निपटारा केला. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.
विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, “मी आता सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतली, त्यामुळे मी सुट्टीवर आहे, हे खरं नाही. खरं तर मी डबल ड्युटीवर आहे”
