मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे देणार इन्कोव्हॅक लस

राजधानी दिल्लीसह राज्यभरत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक ही नाकावाटे लस दिली जाणार आहे. लसीचे मोफत डोस केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच उपलब्ध असतील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

१६ जानेवारी २०२१ पासून देशभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसार मुंबईत प्राधान्य गटांचे आणि त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. करोना लशीची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे.
आता २८ एप्रिलपासून ‘इन्कोव्हॅक’ ही लस ६० वर्षे वयावरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी या लशीची वर्धक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लशीसाठी वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक ही नाकावाटे लस दिली जाणार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यात येणार आहे.
इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. 20 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात 5 हजार 233 कोरोना रुग्ण आढळले होते. 13 ते 19 एप्रिल दरम्यान ही संख्या 6 हजार 102 तर 6 ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 421 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.