अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभवी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे. तब्बल दहा वर्षानंतर हा निकाल आला आहे.
जिया खान 3 जून रोजी 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूप्रकरणात सूरज पांचोलीचं नाव आलं होतं. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. जियाच्या आईनेही सूरजवर आरोप करून त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. मात्र, सीबीआयने पुराव्या अभावी सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त केलं.
“पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं. विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी या खटल्यातील पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन हा निकाल दिला.जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. मुलीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.
राबिया खान यांच्या म्हणण्यानुसार, जियाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली होती. ३ जून २०१३ रोजी २५ वर्षीय जियाचा मृतदेह तिच्या जुहू येथील घरातून सापडला होता. राबिया यांनी सूरजविरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सूरजला अटकही केली होती.
