राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी 5 मे रोजी समितीचा जो निर्णय होईल तो मला मान्य – शरद पवार

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्यानंतर मी माझ्या निर्णयावर विचार करेन असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. असे ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांची नावे आहेत. या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती काल पवारांनी दिली आहे.

शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे रोजी मिळणार आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल असं म्हटलं जातंय.