काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, वयाच्या 48व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.

गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाईल. उद्या ३१ मे रोजी सकाळी 11 दरम्यान अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज दुपारी 12 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाण्याची शक्यता असून, दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती मिळत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसचे तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.