शिवसेना आणि भाजपा महायुती भाऊ म्हणून काम करते, जाहिरातींमधील सर्वेक्षणाला अर्थ नसतो – चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेनेच्या शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात शिंदे गटाने एक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत. या जाहिरातीतल्या मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे, तर देवेंद्र फडणवीसांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर बसलेलं पाहायचं आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी या जाहीरातीबद्दल विचारलं, त्यावर त्यांनी दोघेही चांगलं काम करतायत, असं सांगितलं.“मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे चांगलं काम करतायत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून एक चांगलं, लोकप्रिय बजेट मांडलं. सरकारचा परफॉर्मन्स चांगलाय, तो सर्वेक्षणातून दिसतोय. त्यामुळे देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, या निष्कर्षाला अर्थ नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले की, दोघेही चांगले बॅट्समन आहे राज्यातील जनतेला काय हवं, सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता जनतेने हे सरकार दिला आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.तसेच कुणाचं महत्त्व कुणामुळे कमी होत नाही. मी कोणाला कमजोर समजलो तर तो कमजोर होत नाही हा निर्णय जनता घेत असतं जनता पसंत करत असतं त्यामुळे जाहिरातीमध्ये सर्वेक्षणामध्ये आलेल्या पसंतीला अर्थ नसतो निवडणुकीमध्ये काय पसंती मिळतं याला जास्त अर्थ असतो. असे बावनकुळे म्हणाले.

“शिवसेना आणि भाजपा महायुती भाऊ म्हणून काम करते. देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघांच्या मनात परस्पराद्दल चांगली भावना आहे.“कोणाच महत्व, कोणामुळे कमी होत नाही. 45 प्लस खासदार निवडून आणण्यावर आम्ही काम करतोय. कमजोर समजता म्हणून कोणी कमजोर होत नाही. या राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगलं काम केलं होतं. मुळात कोण मोठं, कोण लहान हे शिवसेना भाजपात महत्त्वाचं नाही.