झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी नारायण राणे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. “मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं. पण, दोनदा बाळासाहेब ठाकरेंना तयार करून मी उद्धव ठाकरेंना आणलं. बाळासाहेब ठाकरेंना एकच धमकी असायची, घर सोडण्याची,” असं नारायण राणेंनी सांगितलं.
अवधूत गुप्ते यांनी नारायण राणे यांना बोचरे प्रश्न विचारले. त्यावर नारायण राणे यांनी आपल्या शैलीत उत्तरं दिली. आमदार उचलून आणणं, सरकार पाडणं यात तुमची त्यावेळी मास्टरी झालेली होती. आता हाच प्रकार उद्धव ठाकरेंसोबत झालाय. जर आता तुम्ही शिवसेनेत असता तर असं झालं नसतं? तुम्ही त्यासाठी काय केलं असतं? असा सवाल अवधूत गुप्तेने नारायण राणे यांना विचारला.
यावर, मी शिवसेनेत असतो तर त्यांची वाईट अवस्थाही झाली नसती. 40 सोडा… एक आमदार इकडचा तिकडं जाऊ शकत नव्हता, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. त्यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलं, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
‘बाळासाहेबांना जे वाटायचं राज्य कारभाराबद्दल ते मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांना खात्री होती, की याला सांगायची गरज नाही, हा करणार. त्यांना एखादं पुस्तक मला द्यायचं असेल, तर ते लिहायचे, माझा शिवसैनिक नारायण राणे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र लिहिलं नाही, माझा शिवसैनिक असायचंच’ अशी आठवणही राणेंनी सांगितली.
खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात संजय राऊत म्हणतात की, ‘नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. आता फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे, की बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून मी नेमलं.’“हे माझं पाप आहे” यावर नारायण राणे म्हणाले की, “याला खासदार मी केलं, नाहीतर झालाच नसता. तेव्हा खासदार झाला नसता, तर पुढे कधीच खासदार होत नाही. हे माझं पाप आहे.”
