इंटरनेट वर दर दिवशी अनेक व्हिडियोज व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडियोज हे त्या निरागसपणामुळे सदैव लक्षात राहतात. असाक एक व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे, तो म्हणजे एका चिमुकलीने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोंदवलेल्या तक्रारीचा. या चिमुकलीला फडणवीसांना भेटायचं होतं, मात्र तिच्या ‘पप्पांनी’ तिला त्यांच्यासोबत आणलंच नाही, आणि म्हणून ही लहान मुलगी नाराज झाली. हा अतिशय गोड आणि निरागस संवाद नक्कीच बघण्यासारखा आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उत्तम केंदळे यांच्या कन्येसोबत हा संवाद फडणवीस यांनी सांगितला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रेमानी तिला तिचे नाव विचारले. आणि ‘शाळा सुरु आहे का ?’ असा प्रश्न विचारल्या नंतर तिने अतिशय निरागस असे उत्तर दिले, “ऑनलाइन आहे”. त्यानंतर फडणवीस फोन ठेवत असताना ती अचानकच म्हणाली, “मला तुम्हाला भेटायला यायचं होतं, पण पप्पांनी आणलंच नाही.” ही अतिशय गोड अशी तक्रार तिने यावेळी केली, आणि एकच हशा पिकला.
एखाद्या लहान मुलाची मागणी ही किती साधी आणि सरळ असते. तिला फडणवीसांना काही आपली कामं काढून घ्यायला भेटायचं नव्हता, का कसले पेपर्स पास करून घ्यायला भेटायचं नव्हतं. तिची फक्त एक इच्छा होती, या काकांचं इतकं नाव ऐकलं आहे, मला पण त्यांना एकदा भेटायचं आहे. बास एवढंच. किती निरागस आणि छोटी अपेक्षा. मात्र कामाच्या निमित्ताने भेटत असल्यामुळे साहजिकच तिला आपल्यासोबत घेऊन जाणं उत्तम केंदळे यांना शक्य नव्हतं आणि म्हणूनच तिने व्हिडियो कॉलच्या माध्यमातून हा संवाद साधला आणि आपली तक्रार नोंदवली.
आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणणारा हा व्हिडियो आहे. म्हणायला तर अगदी छोटीशी घटना आहे ही, मात्र यातील निरागसपणा आपल्याला हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहण्यास भाग पाडतो.
