भारताचे डिस्को किंग बप्पी लहरी यांचे निधन, एका युगाचा अंत…!


सुमारे 5 दशके आपल्या मधुर संगीताने बॉलिवुड वर राज्य करणारे आणि आपल्या संगीताच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप सोडणारे ‘गोल्डन सिंगर’ आणि प्रख्यात संगीतकार बप्पी लहरी यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा निघून जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी भरून निघणे अतिशय कठीण आहे.

जेव्हाही आपण ‘तम्मा तम्मा लोगे’ ‘याद आ रहा है तेरा प्यार’ ‘डिस्को डांसर’ ही गाणी ऐकतो आपल्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे बप्पी दा यांचा. ‘बप्पी दा’ हे त्यांना सिने सृष्टीने दिलेलं प्रेमाचं नाव होतं. त्यांचा जन्म 1952 साली पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली ‘नन्हा शिकारी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये प्रवेश मिळवला. त्यांच्या एका विशिष्ट शैलीमुळे ते गेल्या 3-4 पिढ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे एक विशिष्ट स्मित हास्य, काळं जॅकेट आणि त्यावर घातलेल्या सोन्याच्या चेन्स असे त्यांचे एक विशिष्ट चित्र त्यांच्या चाहत्यांच्या मनावर नेहमीसाठी कोरलं गेलं आहे.



Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लेहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.

बप्पी लहरी यांच्या संगीताची जादू आणि त्यांच्या आवाजाचा करिश्मा येत्या अनेक पिढ्यांपर्यंत तसाच राहील यात मात्र काही शंका नाही. त्यांच्या आत्म्याला सदगती लाभो.