मुंबईत ईडीचे धाडसत्र; ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोव्हिड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आज 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही समावेश आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आलं असं सांगितलं. तसंच आमदार गीता जैन यांनी अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावलेल्या प्रकरणावरही भाष्य केलं.

मुंबईतील ईडीच्या छापेमारीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, नेमकी काय कारवाई चाललीय आहे, याबद्दल मला माहिती नाही पण एवढं निश्चित सांगतो, ज्यावेळेस मुंबई महानगर पालिकेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले, त्या कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला तेव्हा धक्कादायक माहिती बाहेर आली होती.त्यावेळी कशाप्रकारे कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आलं. यातून अनेक मृत्यू झाले. पुण्यात तर एक पत्रकाराचाच त्यावेळी मृत्यू झाला त्याची चौकशी चालू होती. ही चौकशी कुठपर्यंत कुठपर्यंत पोहचली आहे, आता या छाप्यामध्ये काय मिळालं हे ईडी सांगू शकेल. मला त्याची कल्पना नाहीये असेही देवेंद्र फडणीस म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाड टाकण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावरच धाड टाकण्यात येत असेल. यासंदर्भात ईडीच अधिकृत माहिती देऊ शकेल”.”लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, रान अनावर होऊ शकतो. पण तरीही त्यांनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणं योग्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी गीता जैन प्रकरणावर बोलताना सांगितलं.

ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. यावरून आणखी किती लोकांची चौकशी सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, “ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल. यासंदर्भातील अधिकृत माहिती ईडी अधिकारीच देऊ शकतील.”