१ जुलैला मिळणार ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ४००० रुपये

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास ७३ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, राज्यातील १६ लाख तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख १६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरणासह इतर निकष पूर्ण केलेले नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख ४८ हजार ९६७ शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्या सर्वांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता. पण, त्यानंतर आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, लाभार्थींच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित नोंद करण्याचे बंधन घालण्यात आले. त्यात अजूनही एक लाख १६ हजार ४२८ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता सर्वांना शेवटची संधी दिली जाणार असून त्यानंतरही राहिलेल्यांची नावे कायमची योजनेतून बाद केली जाणार आहेत.

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलैला या योजनेतील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा १४ हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा पहिला हप्ता जारी करण्यात येणार आहे. यासाठी १ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पण, अजूनही आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, मालमत्ता नोंदी न केलेले १६ लाख शेतकरी आहेत. त्यांना लाभ मिळणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तत्काळ या प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.