एमपीएससी परीक्षा, तारखांचा घोळ आणि विद्यार्थ्यांचे हाल…!



महाराष्ट्र, त्यातून पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. मात्र आज त्याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. असे असताना विद्यार्थ्यांचे किती हाल होत आहेत, याचा विचार सरकार कधी करणार असा प्रश्न इथे उद्भवला आहे. एकूण मुद्दा काय आहे ?   आणि विद्यार्थी का इतके संतापले आहेत ? जाणून घेऊयात |

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या अशा परीक्षा आहेत. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अनेक तरुण आपल्या आयुष्यातील उमेदीची ४-५ कधी कधी अधिक वर्षेही लावतात. असे असताना कोरोना काळात त्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. परीक्षांची तारीख आधी दिवाळी मग त्यानंतर १४ मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र अचानक २ दिवसांआधी या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या. आणि कारण देण्यात आले कि, परीक्षा घेण्यासाठी जो कर्मचारी वर्ग आवश्यक असणार आहे, तो सध्या कोविडच्या जबाबदाऱ्या पेलण्यात लागला आहे, त्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र यामुळे विद्यार्थीवर्ग भरपूर संतापलेला आहे. अनेक विद्यार्थी कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अतिशय विपरीत परिस्थिती मध्ये केवळ या परीक्षांसाठी तग धरून, मित्रांकडून घरच्यांकडून पैसे उसने घेऊन राहत होता आणि अभ्यास करत होता. मात्र राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे तसेच कुणाचाच पायपोस कुणात नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आता डोक्यावरुन पाणी गेले आहे, त्यामुळे ते भरपूर चिडले आहेत.


विद्यार्थी रस्त्यावर उतरून परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्या यासाठी मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्रात शाळा कॉलेज सुरु होऊ शकतात, ऑफिसेस सुरु होऊ शकतात एवढेच काय तर बिअर बार देखील सुरु होऊ शकतात मात्र आमच्या परीक्षा घेता येत नाहीयेत असे का ? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/roh__rk/status/1370213360252293124/photo/1


विद्यार्थ्यांचा रोष बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिपत्रक जाहीर केले कि, परीक्षेची तारीख २२ मार्च पर्यंत घोषित करण्यात येईल तसेच यामध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत. मात्र तरी देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, असे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात विद्यार्थ्याेच भवितव्य काय असेल ? या परीक्षा कधी होतील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.