कोरोना निर्बंधांमुळे जनतेत अस्वस्थता, पुन्हा एकदा चर्चा करून निर्णय घ्यावा : देवेंद्र फडणवीस

कोरोनाला कमी करण्यासाठी राज्यात जे निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यामुळे जनतते खासकरून छोट्या व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. या निर्बंधांमुळे आता कुठे वर येत असलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांना बघता, मोठा असंतोष आहे. कोरोना कमी करणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी हा अघोषित महिन्याभराचा लॉकडाउन कितपत योग्य आहे ? यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात असर होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.

यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही.



सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एकूणच सध्या महाराष्ट्रात सावळा गोंधळ सुरु आहे. जिथे एकीकडे कोव्हिडचा प्रकोप भयंकर वाढला आहे, तर दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप लागला आहे, आणि त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. ज्या राज्यात सरकारचेच ताळतंत्र एका जागेवर नाही. तिथे सामान्य माणसाचे काय होत असेल ? हा एक मोठा प्रश्न आहे.