
राज्यात आलेल्या ‘तॉक्ते’ या वादळाने मोठ्या प्रमाणात राज्यातील काही गावांचे आणि किनारपट्टीवरील काही ठिकाणांचे नुकसान केले आहे. आणि त्यामुळे राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. वादळानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोकण येथे गेले असता, त्यांनी जनतेशी संवाद साधला, हा संवाद साधल्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात “लोकांच्या समस्या ऐकून अंगावर शहारे येतात. पूर्वीच्या वादळाची मदत नाही. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय ठप्प. आता या नव्या चक्रीवादळाचा फटका. घरातीच चीजवस्तु विकून उदरनिर्वाह. आता तरी महाविकास आघाडी सरकारने मदत करावी!”
या चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी वसलेल्या कोकणाची परिस्थिती मात्र बिकट झाली आहे. आधीच लॉकडाउन असल्या कारणाने लोकांना आपापल्या कामांवर जाणे शक्य नव्हते. कोकणची परिस्थिती पाहता येथील लोक पर्यटन, दुकानं आणि त्यांच्या व्यवसायावर उदर निर्वाहासाठी अवलंबून असतात मात्र कोव्हिड आणि लॉकडाउनची परिस्थिती पाहता या तीनही गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे, असे असताना सामान्य माणसाला एक मोठ्या चक्रीवादळाचाही सामना करावा लागला. ज्यामुळे होतं नव्हतं ते ही गेलं, ही परिस्थिती भीषण आहे, आणि त्यासाठी राज्य सरकार तसेच समाजसेवी संघटनांनी पुढे येणे आवश्यक आहे.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटर वर रत्नागिरी येथील काही फोटोज शेअर करत या विदारक परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. हे फोटोज बघून आपल्याला लक्षात येईल कि एकूणच परिस्थिती भयंकर आहे, आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागताएत.
यावेळी परिस्थितीची पाहणी करण्यासोबतच फडणवीस यांनी संगमेश्वर येथील डेडिकेटेड कोव्हिड सेंटरला भेट दिली. आणि तिथली माहिती देखील त्यांनी सांगितली आहे. एकूणच सध्या राज्याची कोव्हिड परिस्थिती, त्यातून वादळानंतरची परिस्थिती पाहता राज्य सरकारची महाराष्ट्राला खूप जास्त गरज आहे.
