महाराष्ट्रात या सरकारमुळे आणीबाणी सदृश्य परिस्थिती : फडणवीस



काल महाराष्ट्रात विधानसभेच्या मान्सून सत्राचा पहिला दिवस होता, आणि हा पहिलाच दिवस भरपूर गोंधळाने भरलेला होता. या पहिल्या दिवशीच भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले, सभागृहात गदारोळ आणि शिवीगाळ देखील झाला. त्यानंतर आज विरोधी पक्षाने या विरोधात निदर्शने केली. सरकारतर्फे ही निदर्शने थांबविण्यासाठी मार्शल्स पाठविण्यात आले, माध्यमांना देखील तिथून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ ज्याप्रकारे माध्यमांना धक्काबुक्की करण्यात आली, मार्शल्स पाठविण्यात आले, त्यावरुन महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षाने “सभागृहात दडपशाही होते, म्हणून आम्ही विधान भवन परिसरात आमची अभिरूप विधानसभा भरवू” असे म्हणत विधानभवनाच्या पायऱ्यांना आपसे सदन घोषित केले, आणि आपली मते व्यक्त केली. “सदनात लोकशाहीचा मृत्यू झाला” असे देखील विरोधी पक्षाकडून अनेक आमदारांनी म्हटले आहे. एकूणच महाराष्ट्रात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली आहे.



“ या सरकारचे पितळे आता उघडे पडते आहे. या सरकारने ओबीसी आरक्षणासाठी काही केले नाही, हे सरकार ओबीसी, मराठा आणि मागासवर्गीयांच्या विरोधातले सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकार आहे. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी हे सरकार काम करते” असे देखील विरोधी पक्षाकडून सांगण्यात आले.



“महाराष्ट्रात या सरकारच्या नेतृत्वात बोगस लसीकरण करण्यात आले, आज इतक्या मोठ्या प्रमाणात या सरकारच्या माध्यमातून अडचणी तयार होताएत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे सरकार विसरले आहे. विमा कंपन्यांशी देखील सरकारने साटंलोटं करून हजारों कोटी रुपयांचा नफा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे.” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

एकूणच सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय गोंधळ सुरु आहे. हा गोंधळ या सरकारची उतरती पायरी तर नाही ना? असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. या घटनेत पुढे आता काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.