जेव्हा पंतप्रधान महिला हॉकी टीमशी बोलतात, आणि पाणी आपल्या डोळ्यात येतं…!



काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी टीमच्या ओलंपिक मधील विजयानंतर त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशाने पंतप्रधान मोदींच्या या एका फोनचे खूप कौतुक केले. मात्र आज त्यांचा महिला हॉकी टीम सोबत झालेला संवाद अधिकच खास होता, आणि आपल्या सगळ्यांनाच भावुक करणारा होता. पंतप्रधान मोदी यांनी महिला हॉकी टीमच्या पराभवानंतर त्यांना फोन करून त्यांचे उत्साहवर्धन केले. या कठीण प्रसंगी त्यांचे मनोबल वाढवले, आणि त्यांना ही जाणीव करून दिली कि, आज जरी आपला पराभव झाला़ असला तरी भारताची शान हॉकीचे पुनर्जीवन करून तु्म्ही देशातील अनेक मुलींना प्रेरणा दिली आहे. डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडियो आज संपूर्ण देशाने बघितला.

आज भारताच्या महिला हॉकी टीमने ओलंपिक मध्ये कांस्य पदकासाठी रंगलेल्या सामन्यात खूप उत्तम प्रदर्शन केले. अतिशय उत्तम खेळी करून देखील ग्रेट ब्रिटेन ने 4-3 अशा अंकाने भारतावर विजय मिळवला. भारतीय महिला हॉकी टीम आज पराजित जरी झाली असली तरी आज 130 कोटी भारतीयांच्या मनावर त्यांनी विजय मिळवला आहे. आणि पंतप्रधान मोदी यांच्या या एका फोननी त्याची पावती दिलेली आहे.



हे दृश्य खूपच भावुक करणारे होते. या काही मिनिटांच्या फोनमध्ये पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची चौकशी केली, नवनीतला झालेल्या जखमेबद्दल त्यांनी विचारपूस केली, वंदना कटारिया, सलीमा, रानी रामपाल यांच्या खेळाचे कौतुक केले. हा फोन ऐकत असताना सर्व खेळाडू अतिशय भावुक झाल्या होत्या, रडत होत्या, पंतप्रधानांनी केवळ त्यांचे सांत्वनच केले नाही, तर त्यांना त्यांच्यात असलेल्या ताकदीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचे होते.

आपण अतिशय खचलेल्या अवस्थेत असताना, आपल्या घरातील वडील मंडळींनी येऊन आपला हात धरून आपल्याला उठवावं, आणि आपण गमावलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जागं करून आपल्या गुणांची, मेहनतीची, आपल्यात असलेल्या शक्तीची आपल्याला आठवण करून द्यावी, तसेच हे दृश्य होते. आपला देशप्रमुख हा केवळ विजयाच्या वेळी कौतुकच करत नाही तर पराजयाच्या वेळी खचलेल्या आपल्या माणसांना परत आपल्या पायावर उभं देखील करते याची ही सुंदर प्रचिती होती.

याआधी मोदींनी चंद्रयान अयशस्वी झाले तेव्हा इस्रोच्या प्रमुखांना जवळ घेत त्यांचे सांत्वन केले होते, तेव्हा जसे भारतीयांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत होते, तसंच काहीसं दृश्य आज देखील बघायला मिळालं. आज ग्रेट ब्रिटेने सामना जरी जिंकला असला तरी जगाची मनं पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या या शेरनियाँ म्हणजेच आपल्या महिला हॉकी टीमने जिंकली आहेत, हे मात्र खरं.