कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर, मुंबईकरांना दिलासा…!

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आणि ओमाइक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. कोरोनाचे वाढणारे आकडे आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात उभी राहणारी भिती पाहता आज आलेली बातमी नागरिकांना दिलासा देणारी आहे. मुंबईत आता कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रोज येणाऱ्या आकड्यांमध्ये कमी दिसून आली आहे. याचे कारण ओमाइक्रोन व्हेरिएंट असल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हणतात हा व्हेरिएंट जितक्या लवकर पसरतो, तितक्याच लवकर तो बरा देखील होत आहे. साधारणपणे 5 दिवसांमध्ये रुग्णांची परिस्थिती पहिलेपेक्षा चांगली झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बातमी नागरिकांसाठी दिलासा देणारी आहे.

ओमाइक्रोन व्हेरिएंट जितक्या त्वरित पसरतोय, तितक्याच लवकर त्याचे लक्षण कमी होताना दिसून येत आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी दिसून येत आहे. राज्यातील कोव्हिडची परिस्थितीबद्ल कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. अजीत देसाई म्हणाले की, “4 दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या पार होती. परंतु, काल (मंगळवारी) 11 हजार दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामागे काही कारण आहेत. सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांचा परिणाम दिसून येत आहे. तसेच नागरिक सतर्क झाले असून काळजी घेत आहेत.”



कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक तरुणांना आपल्यासोबत खेचून नेले. अनेक घरांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. नागरिकांच्या मनामध्ये दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाविषयी खूप मोठ्या प्रमाणात भिती बसलेली होती. मात्र या बातमीमुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मुंबईच्या अनुभवावरून असे म्हणता येऊ शकते कि हळू हळू देशात तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होईल आणि जनजीवन पूर्वपदावर येईल, मात्र तोवर आपण सगळ्यांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे, आणि काळजी घेणे देखील आवश्यक आहे.