
दिशा सालियान आत्महत्ये प्रकरणी गेल्या एक दीड वर्षात भरपूर चर्चा झालेली आहे. मात्र नुकतेच दिशा सालियानच्या आई वडिलांनी वक्तव्य करून या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे. दिशाचे आई वडील म्हणाले कि, “दिशाच्या आत्महत्येचे कारण तिच्या कामासंबंधी ताणतणाव होता. तिच्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमधून देखील अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. मात्र तरी देखील रोज वेगवेगळे तर्क सांगून दिशाला बदनाम करण्यात येत आहे. तिच्यावर बलात्कार झाला, तिचा खून झाला असे सगळे रोज बोलण्यात येत आहे आणि म्हणून आम्हाला कधीच सोडून गेलेली आमची मुलगी रोज मरतेय.”
त्यांच्या या एका वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणात खळबळ माजली आहे, आणि एक वेगळेच वळण लागले आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्युमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आणि दिशा सालियानच्या मृत्युला या प्रकरणी जोडण्यात आलं. त्यामुळे दिशाचा मृत्यू देखील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट तर नाही ना ? सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमागे एकच व्यक्ति, किंवा कारण तर नाही ना ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यावरूनच रोज वेगवेगळे तर्क वितर्क करण्यात येत आहेत. असे असताना दिशाच्या आई वडिलांचे हे वक्तव्य खूप महत्वाचे ठरते.
आमची देखील जगण्याची इच्छा संपली, आणि त्याचे कारण नेते आहेत :
दिशाचा मृत्यू झाल्यापासून नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि दिशाच्या मृत्यूवर झालेल्या राजकारणामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो आहे, आणि आमची सुद्धा जगण्याची इच्छा संपली आहे. आणि आम्ही जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट केलं, तर त्यासाठी हे नेते जबाबदार ठरतील, असे वक्तव्य देखील त्यांनी केले.
नुकत्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दिशाच्या आई वडीलांना भेटायला गेल्या होत्या, त्यावेळी तिच्या आी वडीलांनी हे वक्तव्य केले.
एकूणच प्रकरण वेगळ्या वळणाला लागलं आहे, आणि याविषयी पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
