
राणा दांपत्याची आज १२ दिवसांनी रुग्णालयात भेट झाली. आणि त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. तब्बल १२ दिवसांनी पति पत्नी एकमेकांना भेटले. नवनीत राणा यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आलं कारण त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा अत्यधिक त्रास होत होता. त्यावेळी रवी राणा त्यांना भेटायला आले असतानाचा हा व्हिडियो व्हायरल होत आहे.
आमदार रवी राणा हे खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात येताच नवनीत राणांच्या अश्रूचा बांध फुटला. दोघेही एकमेकांच्या गळात पडले. दरम्यान, हा भावनिक प्रसंग कॅमेरात कैद झाला.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. बुधवारी न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केल्यानंतर आज दोघांचीही सुटका झाली. दरम्यान, नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळेच रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच लीलावती रुग्णालय गाठलं.
नवनीत राणा या गेल्या सहा दिवसांपासून त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास आहे अशी तक्रार करत होत्या, पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.
एकूणच राणा दांपत्य आणि हनुमान चालीसा हे प्रकरण महाराष्ट्रात गाजतंय. हनुमान चालीसा म्हटण्यावरुन राजद्रोहाचा गुन्हा महाराष्ट्रात दाखल करण्यात येतो, यावरुन विरोधीपक्ष तापला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
