देशाच्या १५व्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ…! एक नवीन पर्वाची सुरुवात..!


देशासाठी अत्यंत गौरवपूर्ण क्षण आज घडलेला आहे. एका अतिसामान्य आदिवासी परिवारातील महिला द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५व्या राष्ट्रपती पदी शपथ घेतली आहे. यावेळी त्यांना २१ तोपांची सलामी देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर मुर्मू यांनी केलेल्या भाषणाने सामान्य माणसाचे देखील डोळे पाणावले.

त्या म्हणाल्या “ मी जिथून येते तिथे प्राथमिक शिक्षण मिळवणे देखील एक खूप मोठे स्वप्न असते, अशा ठिकाण हून आलेली एक सामान्य आदिवासी महिला आज इतक्या मोठ्या पदावर स्थानापन्न होते, ही माझी वैयक्तिक उपलब्धि नाही तर हा विजय सर्व गरीबांचा आहे. माझ्या नावाचा या पदासाठी विचार करणे, हे स्पष्ट करते कि, या देशात एक गरीब माणूस केवळ स्वप्नच बघू शकत नाही, तर ते पूर्ण देखील करू शकतो. मी भारतातील युवा आणि महिल्यांना हे वचन देते कि या पदावर असताना त्यांच्या हितांचे रक्षण करणे माझ्यासाठी सर्वतोपरी असेल.”



“मी पहिली भारतीय राष्ट्रपती आहे, जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला, या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन.”

राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवन येथे रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नींची भेट घेतली, दोघांनी त्यांचे अभिनंदन केले, त्यानंतर मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, आणि शपथ घेतल्यानंतर त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती.