ठाकरे गटाला ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरेट नाव तर शिदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव…!


शिवसेना कुणाची ? उद्धव ठाकरे यांची का एकनाथ शिंदे यांची ? या वादाला निवडणूक आयोगाने थोड्या वेळासाठी का होईना पण स्वल्पविराम लावला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे, तर ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले आहे. तर शिंदे गटाचे चिन्ह अजून ठरायचे असले तरी त्यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. एकूणच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही शिंदे गटाकडे गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांना नवीन तीन नावे व पक्षचिन्ह सादर करण्याचे निर्देशदिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी सोमवारी मुदत संपण्याच्या आत ते सादर केले. त्यानंतर सायंकाळपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन्ही गटांतर्फे देण्यात आलेल्या नावे व चिन्हांची छाननी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता आयोगातर्फे घोषणा करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटास त्यांच्या दुसर्‍या पसंतीच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावर स्वीकृती प्रदान केली आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गटास त्यांच्या दुसर्‍या पसंतीच्या ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावास स्वीकृती दिली आहे.

आयोगातर्फे चिन्हाचेही वाटप करण्यात आले असून ठाकरे गटास ‘मशाल’ हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. या चिन्हाचा वापर ठाकरे गटातर्फे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसह याप्रकरणी अंतिम निर्णय येईपर्यंत करता येणार आहे. ठाकरे गटातर्फे ’त्रिशूळ’, ’उगवता सूर्य’ आणि ’मशाल’ या चिन्हांची यादी देण्यात आली होती. त्यापैकी ‘मशाल’ या चिन्हावर शिक्कामोर्तब झाले. त्याचवेळी शिंदे गटातर्फे ’त्रिशूळ’, ’उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन चिन्हे देण्यात आली होती. त्यापैकी एकाही चिन्हास आयोगाने स्वीकृती दिलेली नाही. त्यामुळे शिंदे गटास मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तीन नव्या चिन्हांची यादी आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ती देण्यात आली असून आता त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

एकूणच ठाकरे आणि शिंदे गटामधील चुरशीच्या वातावरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा खमंग झाले आहे, आणि सामान्य माणसाला यामध्ये भरपूर रस निर्माण झाला आहे, यात वाद नाही.