उज्जैनला मिळाला ‘महाकाल लोक’…! पंतप्रधानांच्या हस्ते ‘महाकाल कॉरिडोअर’ चे उद्घाटन…!

उज्जैन: उज्जैन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘महाकाल लोक’ चे लोकार्पण केले. अर्थात उज्जैन येथील महाकाल लोक हे मोदींनी केलेले राष्ट्रार्पणच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथे महाकाल कॉरिडोअरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. संपूर्ण उज्जैन नगरी या समारंभासाठी सजली होती, आणि ते बघून एकूणच उज्जैन येथे महाकाल लोक अवतरला आहे, असे वाटत होते. अतिशय प्रसन्न वातावरणात उज्जैनला महाकाल कॉरिडोअर स्वरूपी एक अमूल्य भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.



देशातील अनेक भक्तगणांसाठी, बाबा महाकालच्या भक्तांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येत्या काही दिवसातच येथे पर्यटकांची आणि भक्तांची वाढ होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. या ठिकाणचे अतिशय सुंदर असे छायाचित्र व्हायरल होत आहेत.

“आक्रमण, शोषण आणि पारतंत्र्यासारख्या संकटातूनही भारत महाकालाच्या आशीर्वादाने मार्ग काढून अमरत्व सिद्ध केले आहे. भारत आज इनोव्हेशन, स्टार्टअप, अवकाश आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होत आहे. त्यामुळे महाकालाच्या आशीर्वादाने भारताची ही भव्य-दिव्यता संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरेल”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उज्जैन येथे व्यक्त केला.

उज्जैन येथील स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान महाकाल मंदिर परिसराचा महाकाल लोक राष्ट्रास अर्पण करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंदिया उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम महाकालाचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चना केली आणि त्यानंतर महाकाल लोक राष्ट्रास अर्पण केला. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताची तिर्थस्थळे ही दीर्घकाळापासून भारताची आस्थाकेंद्रे राहिली आहेत. केवळ आस्थाकेंद्रेच नव्हे, तर राजकारण, अर्थकारण, विज्ञान, खगोलशास्त्र आदींच्या संशोधनाचीदेखील ती प्रमुख केंद्रे होती. भारताची चेतना जागृत करण्याचे काम या केंद्रांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे भारत आपल्या आस्थाकेंद्रांची पुनर्स्थापन करत आहे, तर त्याचवेळी इनोव्हेशन, अंतराळ, संरक्षण, स्टार्टअप या क्षेत्रांमध्ये संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध होत आहे. त्यामुळे भारताची ही भव्यता आणि दिव्यता संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

आधी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे भूमीपूजन आणि निर्माण कार्यास सुरुवात, मग काशी विश्वनाथ आणि आता उज्जैन महाकाल लोक, एक एक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हरवलेली हिंदू अस्मिता पुन्हा एकदा जागृत करत आहेत, आणि भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा देशाला देत आहे, असे सामान्य माणसाचे मत तयार झाले आहे. ‘अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है” असे म्हणणाऱ्यांसाठी आता आशेचे नवीन किरण दिसत आहेत. याविषयी पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.