बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांच्या लाॅंचींगसाठीचा इव्हेंट बनविला आहे. माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांच्याच पावलावर पाऊल टाकत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात यांनीही आपल्या मुलीला यात्रेत लाॅंच केले आहे.

बाळासाहेब थाेरात यांच्या कन्या जयश्री भारत जाेडाे यात्रेमध्ये सहभागी झाल्या हाेत्या. थाेरात यांचा थाेरला मुलगा डाॅक्टर असून अमेरिकेत असताे. जयश्री याही डाॅक्टर असून गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला आहे. संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमांत त्या सहभागी हाेत असतात. भारत जाेडाे यात्रेत त्यांना नेऊन बाळासाहेब थाेरात यांनी आपला राजकीय वारस ठरविल्याची चर्चा आहे. थाेरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे देखील पहिल्या दिवसापासून यात्रेत सहभागी आहेत.
यापूर्वी अशाेक चव्हाण यांनीही मुलगी श्रीजा चव्हाण यांचे राजकारणात लाँचिंग केले हाेते. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये श्रीजा चव्हाण यांचे फाेटाे हाेते. राहुल गांधींसोबत यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या देखील यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे की, राहुल यांच्या यात्रेतला सगळ्यात मोठा अडथळा काँग्रेसचे सरंजामदार नेते आहेत. इथेही ते राहुल यांच्या पुढे पुढे करताहेत. कार्यकर्त्यात याबद्दल तीव्र नाराजी आहे.
