विषय वाढवायचा नाही म्हणूनही अजित पवारांनी लावले दुचाकींवर स्वराज्यरक्षकचे स्टिकर

पुणे : धर्मवीर वादाबाबत मला विषय वाढवायचा नाही असे विराेधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. तरीही उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांच्या हस्ते पुण्यात अनेक दुचाकींवर स्टिकर लावण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे याेग्य नाही, स्वराज्यरक्षक म्हटले पाहिजे असे अजित पवार म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र असून ज्याला धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, अशी भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते धर्मवीर नाही अस म्हणणे हा एक प्रकारे संभाजी महाराज यांच्या विचारांचा द्रोह आहे, असे म्हटले हाेते. यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की मला पुन्हा-पुन्हा विषय वाढवायचे नाहीत.
काम करायचं आहे.

ज्या विचारांचा पगडा आणि संस्कार याला धक्का न लागता पुढे जायची आमची भूमिका आहे. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. एका बाजुला अजित पवार विषय वाढवायचा नाही म्हणत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेच्या पुणे शहर शाखेकडून मात्र त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आशायाचे स्टीकर अजित पवार यांच्या हस्ते अनेक दुचाकींना लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले की, आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केल्यानंतर तातडीने मागे घेतले. मी पण सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेच शहाणे औरंगजेब ‘जी’ म्हणायला लागले. सुषमा अंधारे यांना जर त्यांच्या जिवावर धोका असल्यासारखे वाटत असेल तर सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी. लव्हजिहाद बाबत बिल देखील आलेला नाही त्यामुळे आपण यावर चर्चा करणे उचित नाही.