मुंबई विमानतळाबाबत लोकसभेत राहूल गांधी यांनी केलेले आरोप जीव्हीके कंपनीनेच खोडून काढले आहेत. त्यामुळे कंपनीची बाजू मांडत असल्याचा अविर्भाव करणारे राहूल गांधी अडचणीत आले आहेत.राहुल गांधी यांनी काल लोकसभेत भाषण करताना अदानी व भाजप सरकार यांचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत मोदी सरकारवर अनेक आरोप केले.जीव्हीके समूहावर दबाव आणून मोदी सरकारने मुंबई विमानतळ ‘हायजॅक’ करून अदानी समूहाच्या ताब्यात दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने जीव्हीकेकडून मुंबई विमानतळ जुलै 2021 मध्ये विकत घेतले होते.
या आरोपांवर आता जीव्हीके ग्रुपचे उपाध्यक्ष जी. व्ही. संजय रेड्डी म्हणाले की, मुंबई विमानतळ विकण्यासाठी अदानी ग्रुप किंवा अन्य कोणाचाही दबाव नव्हता. या कराराच्या सुमारे एक वर्ष आधी, आम्ही निधी उभारणीकडे लक्ष देत होतो. आम्ही आमच्या विमानतळ होल्डिंग कंपनीमध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. बंगळुरू विमानतळाचे कर्ज थकीत होत होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांशी चर्चा करत होतो. आम्ही तीन गुंतवणूकदारांशी करार केला आहे. जरी ते अनेक अटी लादत होते. मग कोविड आला आणि विमानतळाचा व्यवहार तीन महिने ठप्प झाला. पैसे आले नाहीत. त्यामुळे कर्ज भरण्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता.
त्याच वेळी गौतम अदानी यांचे भाऊ मला भेटले. म्हणाले की त्यांना मुंबई विमानतळावर खूप रस आहे. त्यांनी फक्त एक महिन्यात पैसे देऊ असे आश्वासन दिले. आमच्यासाठी ते खूप महत्वाचे होते. सीबीआय किंवा ईडीने आमच्यावर कोणताही दबाव टाकला नाही कंपनीला विक्रीची गरज असल्याने आम्ही हा करार केला. कारण आम्हाला कर्जदारांना उत्तर द्यायचे होते.
