पुढच्या वर्षी होणारी विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी झालेली युती, संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाला साथ या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो आणि कुणाचा निक्काल लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू निहार ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची खेळी शिंदे गटाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. निहार ठाकरे हे राजकारणात नवखे आहेत. त्यांचं अचानक नाव पुढे आल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बिंदू माधव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू होते. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी जेंव्हा बंड केले त्यानंतर निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत मदत करत आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निहार ठाकरे यांनी निवडणूक आयोगात मांडलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरच्या दसरा मेळाव्यात शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावर उद्धव यांचे बंधू जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे हे मंचावर दिसले. एकनाथ शिंदे यांची स्तुती करताना जयदेव ठाकरे म्हणाले होते की, एकनाथ शिंदे माझे आवडते मुख्यमंत्री आहेत. अशा मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राला गरज आहे. जयदेव ठाकरे इथेच थांबले नाहीत तर महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांना कधीही एकटे सोडू नये असेही ते म्हणाले होते.
