नवी दिल्ली : जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलणार हे खरं आहे. काही लोकांनी कमळ उमलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराेधकांवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बाेलत हाेते. विराेधकांवर हल्लाबाेल करताना माेदी म्हणाले, आम्ही संकटापासून पळून जाणारे लोक नाही. कधीकाळी ज्यांची ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत सत्ता होती त्यांनी देशासाठी काहीही काम केले नाही.
आमच्या सरकारने आज देशाला जगभरात ओळख दिली आहे. आम्ही कुठलीही समस्या कायम स्वरूपी सोडवत असतो. अनेक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, मात्र अर्ध्याहून अधिक लोकांचे बँकेत खाते नव्हते, आम्ही जनधन योजेनच्या माध्यमातून गरीब नागरिकांना बँकेशी जोडले. यापूर्वी देशात योजना प्रलंबित ठेवण्याचे काम केलं जायचं. मात्र पीएम गती शक्तीच्या माध्यमातून योजना वेगाने पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, गरीबी हटवा असे तुम्ही म्हणायचे पण जनता काम पाहते आहे. त्यामुळे तुम्ही जितका चिखल टाकत जाल तितके कमळ उमलत जाईल.
