निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाहीचा भाग आहे. ज्यांना जे चिन्ह मिळालं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण माझ्या दृष्टीने चिन्ह आणि नाव कुणाला मिळालं याचं लोकांना किती देणंघेणं आहे हे माहिती नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार इतकंच लोकांना जाणून घ्यायचं आहे. मागील दोन तीन वर्षातील अस्थिर सरकारमुळे लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो. ते प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. पक्षाचं नाव आणि चिन्ह हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. स्वराज्यच्या वतीने आमच्या त्यांना शुभेच्छा असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
