केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज पुणे दौरा; भाजपकडून जय्यत तयारी

एकीकडे पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह आज थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहेत.

भाजप नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे शाह केवळ उद्घाटन आणि प्रकाशन कार्यक्रम करणार आहेत. यासोबतच ते ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन, खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांची भेटही घेणार आहेत. त्यानंतर 19 तारखेला बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या एका टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.पुणे पोटनिवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही. अशातच अमित शहांचा पुणे दौरा पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.