पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खरे शिवप्रेमी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वधर्म, स्वभाषा आपल्या संस्कृतीचा या संकल्पना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात साकारलेलं आहे. महाराजांचाच आशीर्वाद त्यांचेच तेज घेऊन काश्मीरपासून ते पूर्वोत्तपर्यंत सगळीकडे ते काम करत आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत साकारण्यात आलेल्या सरकारवाड्याची पाहणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, अमित शाह हे केवळ छत्रपतींना आदर्शच मानतात असं नाही, तर छत्रपतींच्या जीवनावर सातत्याने त्यांनी संशोधन केलं आहे. मराठा साम्राजाच्या संदर्भात वेगवेगळे दस्ताऐवज प्राप्त करून, महाराजांपासून ते वसईच्या संधीपर्यंतचा घटना लेखणीबद्ध करून ते स्वत: यावर एक पुस्तक लिहित आहेत.
फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील शिवभक्त आहेत. मला आजही आठवतं २०१४ मध्ये ज्यावेळी त्यांची घोषणा ही भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाली, त्यावेळी घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम ते महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले, त्या ठिकाणी महाराजांसमोर नतमस्तक होऊन, ध्यान केलं, महाराजांकडून उर्जा घेतली. त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास करत, संपूर्ण भारतावर व भारतीयांच्या मनावर एक अधिराज्य स्थापन करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने मोदींनी केले. शिवसृष्टी प्रकल्पातून महाराजांचा इतिहास, महाराजाचं तेज हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचावं आणि आपला स्वाभिमान हा असाच तेवत रहावा. आपल्याला हे समजावं की पारतंत्र्यात खितपत पडलेले असताना, सगळीकडे अंधकार असताना, त्या अंधकारातून प्रकाशाकाडे कोणी नेलं? आज आपण जे आहोत ते कोणामुळे आहोत? हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने बाबासाहेब पुरंदरे यांनी या शिवसृष्टीची निर्मिती केली. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आणि विशेष करून जी तरुणाई इथे येईल, ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून राष्ट्रप्रेमाचं शिवतेज घेऊन जातील. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची एक उर्मी त्यांच्या मनात तयार होईल, आपल्या संस्कृतीबद्दलचा एक अभिमान त्यांच्यामध्ये तयार होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
