स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते. आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार शासन चालावे असे प्रयत्न त्यांनी केले, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, डॉ.प्रविण दबडगाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते. शाह म्हणाले, स्वभाषेत राजव्यवहार कोष सर्वप्रथम तयार करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला.
शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. स्वराज्यासोबत सुराज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शासनाला आठ विभागात वर्गीकरण करून शासनाच्या कार्याला लिपीबद्ध करण्याचे कार्य केले. स्वराज्यासोबत सुराज्याची कल्पना त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे केली. छत्रपती शिवाजी महाराज युद्धभूमीवर अग्रेसर राहून लढणारे साहसी योद्धा होते. एक कोटी सिंहांचे काळीज त्यांच्याकडे होते हे अफजलखान वधाच्या प्रसंगावरून दिसून येते. उपभोगशून्य राजा कसा असावा याचे उदाहरण महाराजांनी आपल्यासमोर ठेवले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले. मराठी नौसेनेचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्यही महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ राजाचे जीवन नसून एक विचार आहे. हा विचार शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे. लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
